स्वर्णिम भारत ……….७६ वा प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक म्हणजे संघराज्य. आपल्या भारत देशाचं आजचं एकात्म आणि संघटित रूप आपण बघतो आहोत त्याचा पाया आहे संघराज्य. स्वातंत्र्यानंतर 1950 साली 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताकाची, संघराज्याची निर्मिती झाली. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली तीही याच दिवशी. संस्थांनाचं विलीनीकरण आणि भाषावार प्रांतरचना या दोन्हीना यानंतरच वेग आला. विविधतेत एकता जपणारा भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश ठरला. आपली संस्कृती, सण, उत्सव, खानपान, नद्या, पर्वत, मंदिर ही भौगोलिक आणि सांस्कृतिक समृद्धी हा आपला अभिमानबिंदू आहे. दरवर्षी 26 जानेवारीला नवी दिल्ली इथे राजपथावर या वैभवशाली सांस्कृतिक आणि बलशाली भारत देशाचं लघुस्वरूप चित्ररथ आणि संचलनाच्या माध्यमातून दिसतं. या प्रजासत्ताक दिनानिमित्त महत्वाच्या घडामोडिंचा आढावा घेतला तर ते औचित्यपूर्णच ठरेलं. जगाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची घोडदौड सुरू आहे. क्रीडा, शिक्षण, विज्ञान, संस्कृती, तंत्रज्ञान …. सर्वच क्षेत्रात देशाची आगेकूच सुरू आहे. मकर संक्रमणानंतर सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होतो. लवकरच वसंत ऋतुचं आगमन होईल. सुजलाम सुफलाम सृष्टी मोहोरेल. हा आनंद आणि उल्हास टिकून रहावासा वाटत असेल तर परस्पर विश्वास आणि उत्तमतेचा ध्यास हवा. समता, बंधुता, स्वातंत्र्य या मुल्यांचं रक्षण व्हायला हवं. चारित्र्य, देशभक्ती यातून संघटित वृत्तीने देश परम वैभवाला नेण्यासाठी प्रजासत्ताक दिनाइतकं प्रेरक दुसरं औचित्य कोणतं? चला आजच्या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वच जण आपल्या भारताच्या नवनिर्मितीच्या स्वप्नात नवे रंग भरुया.
