धरणलकवा आणि गहाळ झालेला तलाव
धरणे कोरडी पडल्याने गेल्या वर्षी गंभीर पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बेंगळुरू आणि दिल्लीसारख्याच दिशेने मुंबईची वाटचाल सुरू आहे का? तेही भरपूर पाऊस पडूनही! याला कारण आहे तो उद्धव ठाकरे यांचा धरणलकवा आणि बेहिशेबी पाणीगळतीतून गहाळ झालेला एक अख्खा तलाव. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशांमध्ये मुंबई आणि परिसराचा समावेश होतो. इतर आंतरराष्ट्रीय शहरांना पाणीपुरवठ्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागत असतानाच नैसर्गिक पाण्याची देणगी लाभलेल्या अगदी मोजक्या मेगासिटीमध्ये आपल्या मुंबईची गणना होते. पण तरीही… गेल्या दशकभरात अगदी दोन ते तीन वर्षांचा अपवाद वगळता अख्ख्या शहराला दरवर्षी पाणीकपातीचा सामना करावा लागला. अगदी भर पावसातही. अघोषित पाणीकपात, कमी दाबाने पाणीपुरवठा ही तर रोजचीच बाब. याचे एकच कारण धोरणलकवा. शहराची वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेता किमान चार धरणांची गरज आणि त्यासंबंधीचा अभ्यास किमान पंचवीस वर्षांपूर्वी झाला. मात्र २०१४ साठी प्रत्यक्षात सुरू झालेल्या मध्य वैतरणा धरणानंतर मुंबई महापालिकेला एकही धरण किंवा पाण्याचा अधिकचा स्रोत उपलब्ध करून देता आला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची गारगाई धरण की मनोरी निःक्षारीकरण प्रकल्प यावर होत असलेली चलबिचल. गारगाई प्रकल्पाचा अभ्यास शेवटच्या टप्प्यात असताना तो अर्धवट सोडून अर्धवट माहितीच्या आधारे पळत्याच्या (मनारी प्रकल्पाच्या) मागे लागल्याने मुंबईकरांच्या हाती दहा वर्षांनंतरही धुपाटणेच आले आहे. आता महायुतीकडून पुन्हा एकदा गारगाई प्रकल्पाचा जोरदार पाठपुरावा करण्यात येत असला तरी हे धरण बांधून प्रत्यक्ष पाणीपुरवठा होईपर्यंत किमान तीन वर्ष जातील. त्यातच इतर दोन जलप्रकल्पांनाही विलंब झाला असल्याने पुढील काही वर्ष मुंबईकरांना भरपूर पाऊस पडूनही पाणीकपात सहन करावी लागेल, ती ठाकरे यांच्या कृपेने! हे जरा खोलात समजून घ्यायचे असेल तर मुंबईला होत असलेल्या पाणीपुरवठ्याची माहिती घ्यावी लागेल. सध्या, शहराला सात तलावांमधून ३,८५० एमएलडी (प्रतिदिन दशलक्ष लिटर) पाणी मिळते. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १.२४ कोटी होती, ती २०४१ पर्यंत १.७२ कोटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराला दरदिवशी ५९४० दशलक्ष लिटर पाणी लागेल. ही तहान भागवण्यासाठी गारगाई (४४० प्रतिदिन दशलक्ष लिटर), पिंजाळ (८६५) आणि दमणगंगा- पिंजाळ नदीजोड प्रकल्प (१५८६) अशा तीन स्रोतांचा अभ्यास वीस वर्षांपूर्वी सुरू झाला. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची गरज असतानाही प्रत्यक्षात काहीच घडले नाही. गारगाई धरण सर्वात अलिकडे बांधलेला जलाशय म्हणजे मध्य वैतरणा धरण. ते मार्च २०१४ मध्ये कार्यान्वित झाले. त्याचे प्रत्यक्ष काम २००८ मध्ये सुरू झाले होते. त्यासोबतच पालिका गेल्या दशकापासून गारगाई धरणावर काम करत असली तरी, त्या आघाडीवर फारसे काही घडले नाही. या प्रकल्पाला केंद्राच्या वन सल्लागार समिती (एफएसी) आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून पर्यावरणीय मंजुरीही उद्धव ठाकरे यांना मिळवता आली नाही. परवानगी मिळविण्याची प्रक्रिया पाच वर्षांपासून सुरूच होती. निःक्षारीकरण प्रकल्प गारगाई धरणाचे काम पूर्णत्वाला नेण्याऐवजी, मग ठाकरे पितापुत्र मनोरी येथे खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी करून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मागे गेले. पालिका निवडणुकांवर डोळा ठेवून फेब्रुवारी २०२१ मध्ये मनोरी प्रकल्पासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यासाठी एका परदेशी कंपनीची नियुक्ती केली आणि त्यांनाच प्रकल्प देण्याचा आराखडाही तयार केला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा लांबण लागली. या प्रकल्पातून सुरुवातीला प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर पाणी मिळण्याची शक्यता होती व २०२१ मध्ये ३५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र बांधकामाव्यतिरिक्त, वीज, देखभाल आणि दुरुस्तीसाठी या प्रकल्पावर वीस वर्षात ८५०० कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज २०२३ मध्ये वर्तवला गेला. ४ डिसेंबर २०२३ रोजी पालिकेने निविदा काढल्या. महिन्याभरात प्रतिसाद अपेक्षित असतानाही किमान सात वेळा मुदतवाढ देऊनही २०२४ अखेरपर्यंत कोणताही प्रतिसाद आला नाही आणि हा प्रकल्प आता गुंडाळल्यात जमा आहे. गारगाई धरण निःक्षारीकरण प्रकल्पातून फक्त २०० एमएलडी पाणी मिळणार होते त्यामुळे महायुतीने गारगाई धरण प्रकल्पाला गती दिली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाच्या निविदाही काढण्यात आल्या. हा प्रकल्प महाविकास आघाडीने बासनात गुंडाळला होता. या धरणातून मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळून मागणी आणि पुरवठ्यामधील दरी भरून काढता येईल. ३० टक्के पाणी आणि एक तलाव गहाळ एकीकडे शहराची तहान भागवता येत नसतानाच पाण्याची बेसुमार गळती थांबवण्यातही उद्धव ठाकरे यांना अपयश आले आहे. गळती, अनधिकृत कनेक्शन, पाणीचोरी आणि मीटरिंगमधील चुकीमुळे तलावातून शहराकडे आणलेल्या पाण्यापैकी ३० टक्क्यांचा हिशोबच लागत नाही. म्हणजेच हे पाणी वाया जाते. खरेतर हे प्रमाण एकूण पुरवठ्याच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. शहराला ३८५० एमएलडी मिळते. याचा अर्थ जवळजवळ १,१०० एमएलडी गहाळ आहे. दैनंदिन पुरवठ्याच्या प्रमाणात विचारात घेता ही एक मोठी संख्या आहे. ही गळती १५ टक्क्यांपर्यंत कमी करता आली असती तरी रोजचे ५५० दशलक्ष लिटर पाणी वाचले असते. म्हणजेच एक अख्खे धरण बांधण्याचा खर्च वाचवता आला असता. जुन्या पाईपलाईन, सतत गळती, न सापडलेली गळती आणि दुरुस्ती करण्यात होणारा विलंब यामुळे ही समस्या डोईजड झाली आहे. मुंबईला भेडसावणारी पाणीकपात









