– निकिता मिलिंद भागवत
भाषा हे संवादाचे माध्यम आहे. ती वापरली गेली तरच ती टिकून राहते आणि वाढते, हे सूत्र मला मनापासून पटते. मराठी भाषेची सुरुवात जरी घराघरातून होत असली, तरी तिला सार्वजनिक स्वरूप देण्याचे महत्त्वाचे काम शाळा करतात. शाळा हे मराठीच्या प्रचार-प्रसाराचे मुख्य माध्यम आहे, असे मला ठामपणे वाटते.
भाषावार प्रांत रचनेच्या वेळी १०६ हुतात्म्यांनी रक्त सांडून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. मराठी ही महाराष्ट्राची कामकाजाची, कार्यालयीन आणि सार्वजनिक वापराची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे मराठी लोकांचे राज्य हे समीकरण सर्वदूर पसरले. त्या मराठी लोकांच्या महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणजे मुंबई. चर्चगेटपासून बोरिवलीपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मुलुंडपर्यंत विस्तार असलेली मुंबई एका राज्याइतकी आर्थिक उलाढाल करणारी तेव्हाही होती आणि आजही आहे. कागदोपत्री मराठी लोकांचे राज्य असले तरी रोजगाराच्या मुबलक संधींमुळे मुंबई हे कायमच देशभरातील लोकांचे रोजगाराचे ठिकाण बनले. एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाइतका महसूल देणारी, देशात सर्वाधिक कर भरणारी ही मुंबापुरी म्हणजेच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. साहजिकच या कोंबडीवर प्रत्येकाची नजर असणे स्वाभाविक आहे. मराठी माणसांचा परिवार घेऊन समाजकारणातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या शिवसेनेला मुंबईत सत्ता मिळवायला उशीर झाला असला, तरी गेली २५ वर्षे मुंबईने शिवसेनेला एकहाती महापौरपद दिले. प्रत्येक निवडणुकीत मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेना लढली, जिंकूनही आली; पण ज्या मराठी मुद्द्यावर निवडणुका जिंकल्या, तोच मराठी माणूस आणि त्याची मराठी भाषा हळूहळू मुंबईतून अस्तंगत होत चालली आहे. आधी मराठी माणूस गिरणगावातून हद्दपार झाला. मग तो दादर-बांद्रा-माहीमच्या पलीकडे फेकला गेला. मुंबईचा श्वास असलेल्या कापड गिरण्या हळूहळू बंद पडल्या. त्यामुळे कोकणातून मुंबईत येणारा चाकरमानी रोजगाराच्या शोधात कल्याण, डोंबिवली, बदलापूरकडे जाऊन स्थायिक झाला. मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर ढकलला गेला. इंग्रजी शाळांनी लोकांच्या डोक्यात घर केले आणि मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या असंख्य शाळा सुरू झाल्या. साहेबांचे राज्य गेले, पण साहेबांनी मेंदूचा ताबा घेतला. मराठी माणसाबरोबरच मराठी शाळाही तडीपार झाल्या. परिणामी मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न हळूहळू डोके वर काढू लागला. आज मुंबईतल्या केवळ काही भागांतच मराठीचे अस्तित्व उरेल की काय, अशी भीती नव्हे तर दहशत निर्माण झाली आहे. मराठीचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि “मारा, झोडा, खळख अटॅक करा, मराठीचा मुद्दा लावून धरा” असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या दोन्ही पक्षांना मराठी वाचवता आलेली नाही, आणि मराठी माणसासाठी ठोस काहीही करता आलेले नाही. हे कोणतेही भाकीत नाही किंवा हवेतले वाक्य नाही. मराठी शाळांची सद्यस्थिती, पाडून टाकलेल्या शाळांच्या जागी उभे राहिलेले मॉल, थिएटर्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, मराठी शाळांचा घसरलेला पट, निवडणुकांच्या तोंडावर उपलब्ध झालेली जातनिहाय लोकसंख्येची आकडेवारी, प्रत्येक क्षेत्रात घसरलेला मराठी टक्का, परप्रांतीयांच्या हातात गेलेले उद्योग-धंदे आणि त्यासाठी मुंबई महापालिकेने अंथरलेली पायघड्या हे सगळे त्याचे प्रत्यक्ष द्योतक आहे.

राज्य करण्याची वेळ आली की मराठीचा मुद्दा बाजूला ठेवला जातो, आणि त्यावर प्रश्न विचारले की बेजबाबदार, अर्थहीन व मग्रूर उत्तरे देणे ही दोन्ही ठाकरे बंधूंची खासियत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर भागातील एका शाळेची वास्तविक घटना माझ्या कानावर आली. महानगरपालिकेच्या त्या शाळेत आजूबाजूच्या वस्तीतील गरीब घरांमधील मराठी-अमराठी अशी सर्व मुले शिकत होती. मात्र त्या शाळेच्या मध्यवर्ती व मोक्याच्या जागेवर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांची आणि मराठीच्या तथाकथित कैवारींची वक्रदृष्टी पडली. शाळा हलवायची कशी, हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा आजूबाजूच्या वस्तीतील दुकाने, टपऱ्या, गाळे आणि वर्कशॉप्स हेच कामगारांचे रोजगाराचे साधन असल्याचे लक्षात आले. ते साधनच हिरावून घेतले तर कामगार स्थलांतरित होतील, असा हिशेब मांडला गेला. त्यानुसार सर्व स्तरांवरून चक्र फिरले. छोट्या-मोठ्या दुकानांवर, टपऱ्यांवर बुलडोझर चालवण्यात आले. स्वाभाविकपणे वस्ती रिकामी झाली. पुढील वर्षी त्या शाळेचा विद्यार्थीसंख्या-पट निम्म्याहून कमी झाला. नियमांनुसार संख्या अपुरी असल्याचे कारण देत शाळेची परवानगी रद्द करण्यात आली आणि ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. जेणेकरून तिथे आलिशान मॉल उभारता येईल, याची खात्री झाली. हेच आहे मराठी माणसाला, मराठी भाषेला आणि मराठी शाळांना निरोपाची आरती करून विसर्जित करण्याचे सूत्र. आणि आम्ही उघडपणे सांगू इच्छितो की ज्यांच्या हातात राजसत्ता आहे, तेच या कृतघ्न आणि विनाशकारी कृत्याला जबाबदार आहेत, म्हणजे कोण? हे सुज्ञास सांगणे न लगे….
