
मोतीबाग नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू संमेलनास समाजबंधूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजसंघटन, एकात्मता आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संमेलनात पूज्य भावार्थ देखणे यांचे आशिर्वचन लाभले. त्यांनी समाजाने एकत्र येऊन संस्कार, संघटन व सदाचाराचा मार्ग स्वीकारावा तसेच धर्मनिष्ठ जीवन जगण्याचे आवाहन केले.
या वेळी अंजली ताई तागडे यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर सविस्तर विवेचन केले. समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या पाच प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच इतिहास संशोधक पांडुरंग बालकावडे यांनी ‘संघाचे शंभर वर्षांचे यशोगाथा’ या विषयावर मार्गदर्शन करत शतकभराच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा मांडला.
कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक मंडळ व कार्यकर्त्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले.
विशेष म्हणजे, सकल हिंदू संमेलन १ ते ३० मार्च दरम्यान पुणे येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोतीबाग नगर येथील संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे शहरातील विविध भागांत होणाऱ्या या संमेलनांमध्ये समाजातील सर्व बंधूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सकल हिंदू धर्म जागृतीसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम यशस्वी होवो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
