Sankalp Hindu Times

March 9, 2026

देश

बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा आणण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून स्वागत

पुणे : राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने “महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन (Prevention of Fraud & Coercion) Act” पारित करून लागू करावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) या सामाजिक संस्थेने केली होती.  या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच कॅबिनेट बैठकीत हा कायदा आणण्याची तयारी केली आहे, राज्य सरकारच्या या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून स्वागत करण्यात आले.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा आणणयाचे सुतोवाच केल्याने त्यांचे आणि राज्य सरकारचे आभार माणण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघात  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळो सीए सर्वेश मेहेंदळे, संचालक प्रीतम थोरवे, पुष्कर सप्रे उपस्थित होते नागरिक सोशल फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात  नमूद केले होते की, महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भाग विशेषतः धुळे, नंदुरबार, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतराच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. अशा प्रकारचे अवैध धर्मांतर हे व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून सामाजिक सौहार्दालाही गंभीर धोका निर्माण करणारे आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की धर्मांतर हे केवळ व्यक्तीच्या श्रद्धा, स्वेच्छा आणि जाणिवेवर आधारित असावे; दबाव, फसवणूक, आर्थिक लाभ किंवा इतर प्रलोभनाद्वारे केलेले धर्मांतर अवैध ठरले पाहिजे. अशा कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखत सर्व समुदायांचे संरक्षण, धार्मिक समरसता आणि सामाजिक शांतता दृढ होऊ शकते. तसेच परकीय निधी किंवा अनधिकृत धार्मिक बांधकामांचा गैरवापर थांबवता येईल, आणि दोषी संस्था किंवा व्यक्तींवर कठोर कारवाई करता येईल. नागरिक सोशल फाउंडेशनने सार्वजनिक जनजागृती, सामाजिक संशोधन, कायदेविषयक अभ्यास, तसेच कायदा अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारे डेटा, दस्तऐवज आणि समुदाय संवादाच्या प्रक्रियेत राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.  बेकायदेशीर धर्मांतर हा मुद्दा प्रसार माध्यमांनी व्यवस्थित हाताळल्याने हा कायदा होण्याच्या दृष्टीने पाऊल पडले आहे यामुळे नागरिक सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व पत्रकार, वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्यांचे आभार मानले.

देश

संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्तीचे उपक्रम

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताचे वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क तसेच भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद, प्रेरणा आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच सर्वसमावेशक प्रगतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी कार्यालय, न्यूयॉर्क आणि भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्थांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता – सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे” या विषयावर आधारित हा संवाद कार्यक्रम संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर महिलांचे सक्षमीकरण, समानता आणि न्यायप्रवेश याविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र महिला आयोगाचे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या प्रश्नांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधले जात आहे. भारतीय स्त्री शक्तीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले आहे. या मान्यतेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी भारतीय स्त्री शक्तीला प्राप्त झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी ठरविलेल्या सतत विकास उद्दिष्ट क्रमांक ५ अंतर्गत स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यावर भर दिला जातो. या उद्दिष्टाची पूर्तता करताना महिलांसोबत पुरुषांचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याची जाणीव जगभरात वाढत आहे. या विचाराला पुढे नेत भारतीय स्त्री शक्तीने महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासात पुरुषांचाही सहभाग असावा यासाठी सातत्याने आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात “बदलती पुरुषत्वाची संकल्पना” या विषयावर एक लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून समाजात बदलत्या मूल्यांबरोबर पुरुषांची भूमिका कशी असावी, तसेच स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांचा सकारात्मक सहभाग का आवश्यक आहे, याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विषयावर पुढे एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादात महिला व बालकल्याण मंत्री सावित्री ठाकूर यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने समाजाने कोणती पावले उचलली पाहिजेत यावर विचारमंथन होणार आहे. याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर चर्चा होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केवळ पुरुषच नव्हे तर महिलांनाही समान संधी मिळावी, तसेच त्या क्षेत्रात महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे, या दृष्टीने हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय स्त्री शक्तीच्या या उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top