
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताचे वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क तसेच भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद, प्रेरणा आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच सर्वसमावेशक प्रगतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
तसेच संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी कार्यालय, न्यूयॉर्क आणि भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्थांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता – सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे” या विषयावर आधारित हा संवाद कार्यक्रम संयुक्त राष्ट्र महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येत आहे.
जागतिक स्तरावर महिलांचे सक्षमीकरण, समानता आणि न्यायप्रवेश याविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र महिला आयोगाचे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या प्रश्नांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधले जात आहे.
भारतीय स्त्री शक्तीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले आहे. या मान्यतेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी भारतीय स्त्री शक्तीला प्राप्त झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी ठरविलेल्या सतत विकास उद्दिष्ट क्रमांक ५ अंतर्गत स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यावर भर दिला जातो. या उद्दिष्टाची पूर्तता करताना महिलांसोबत पुरुषांचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याची जाणीव जगभरात वाढत आहे. या विचाराला पुढे नेत भारतीय स्त्री शक्तीने महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासात पुरुषांचाही सहभाग असावा यासाठी सातत्याने आग्रह धरला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात “बदलती पुरुषत्वाची संकल्पना” या विषयावर एक लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून समाजात बदलत्या मूल्यांबरोबर पुरुषांची भूमिका कशी असावी, तसेच स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांचा सकारात्मक सहभाग का आवश्यक आहे, याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या विषयावर पुढे एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादात महिला व बालकल्याण मंत्री सावित्री ठाकूर यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने समाजाने कोणती पावले उचलली पाहिजेत यावर विचारमंथन होणार आहे.
याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये “समान संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर चर्चा होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केवळ पुरुषच नव्हे तर महिलांनाही समान संधी मिळावी, तसेच त्या क्षेत्रात महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे, या दृष्टीने हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
भारतीय स्त्री शक्तीच्या या उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
