१७ जुलै १९३५ रोजी, अक्कलकोट शहरामध्ये डॉक्टर अरुण यशवंत परिचारक यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे अक्कलकोट आणि सोलापूर येथे पूर्ण करून वैद्यकीय शिक्षण पुणे इथे पूर्ण करून १९५७ पासून वैद्यकीय व्यवसाय अक्कलकोट येथे, केवळ गरीब आणि गरजू समाजाची अल्प दरात निस्पृह सेवा करण्या साठी, सुरू केला. गरीबांचे डॉक्टर ही त्यांची खरी ओळख.
आपला व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळून अतिशय तन्मयतेने त्यांनी समाज सेवाही केली.

अक्कलकोट मध्ये स्वामी संगीत संसद स्थापून अनेक वर्षे चालवली या काळात त्यांच्या प्रयत्नाने अनेक नामवंत कलाकारांनी संसदेत हजेरी लावली. अक्कलकोट मध्ये लायन्स क्लब ची स्थापना करून या लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष केला. लायन्स पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा स्थापन केली. या शाळेचे चेअरमन म्हणून परिश्रमपूर्वक बरीच वर्षे काम करून शाळा नावारूपास आणली.

अक्कलकोट एजुकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य आणि कॉलेज च्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणूनही अनेक दिवस सेवा केली. पुणे आणि शिवाजी विद्यापीठ येथे बोर्ड ऑफ स्टडीजचे सभासद म्हणूनही काम पहिले. SSC- अक्कलकोट च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच व्याख्यानमाला आयोजित केली.
महाराष्ट्र बोर्ड ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनचे मानद सदस्य म्हणून ६ वर्षे काम केले
नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या वैद्यकीय संघटनेचे कार्य महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आणि सभासद म्हणून अनेक वर्षे केले. त्यात उल्लेखनीय म्हणजे निमा ची घटना आणि नियमावली बनवली.
अक्कलकोट शहरात पहिले ब्लड डोनेशन शिबिरं, पोलिओ डोस, फ्री मेडिकल कॅम्पस , गरजू ना मोफत रुग्णसेवा , आरोग्यविषयक जनजागृती इत्यादी अनेक कार्यक्रम केवळ समाज सेवा म्हणून राबवले.

त्यांच्या या कामाची दखल , ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अँड एजुकेशनल ग्रोथ या संस्थेने घेऊन त्यांना ‘चिकित्सक रत्न’ या पदवीने भूषविले. त्याच प्रमाणे निमा ने ही ‘ निमा रत्न’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा आणि सेवेचा गौरव केला. लायन्स क्लबने ही वेळोवेळी त्यांचा गौरव केला आणि नुकताच चार्टर मेंबर म्हणून सत्कार केला.
कै. डॉक्टर सरोजा, त्यांच्या दिवंगत पत्नी, अक्कलकोट शहरातील पहिल्या महिला डॉक्टर, यांचाही त्यांच्या या सेवेत १९५९ पासून तहहयात सक्रिय सहभाग होता.

त्यांच्या पश्चात् त्यांची कन्या डॉक्टर आसावरी विश्वजीत पेडगावकर त्यांचा वसा अक्कलकोट मध्ये पुढे चालवित आहे. त्यांची जेष्ठ कन्या सौ. अनुराधा जयंत गबाळे Reserve बँकेतून निवृत्त होऊन ठाणे येथे स्थायिक आहे.
अशा या हरहुन्नरी, समाजसेवी, गरीबांच्या डॉक्टरांचे आणि “अक्कलकोट भूषण” वयाच्या ९० व्या वर्षी दिनांक १३ मार्च २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
