
पुणे : अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नूमवि वाद्यपथकाच्या सहकार्याने उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झालेआयोजित करण्यात आलेले एकदिवसीय वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. रामनवमीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू/काचबिंदू), दातांची तपासणी, रक्तातील विविध घटकांची तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी, रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची तपासणी अशा विविध सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे १३,५०० रुपयांच्या तपासण्या नागरिकांना विनामूल्य करण्यात आल्या.
पुण्यातील पर्वती, कर्वेनगर, मंडई परिसर तसेच पद्मावती येथे आयोजित या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. विविध ठिकाणी रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शनही तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.
आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सर्वसामान्यांना सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. आयोजकांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित कार्यकर्ते, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांचे विशेष योगदान राहिले.
