Sankalp Hindu Times

नवी मातोश्री पैसा कसा फिरवते ?

-प्रसाद काथे

मातोश्री या बंगल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात आदर आहे तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. स्थानीय लोकाधिकार समितीतून भूमिपुत्राच्या पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या बाळासाहेबांचे हे घर त्यासाठीच एकेकाळी आदरस्थान राहिले. मात्र, २००२ च्या मुंबई मनपा निवडणुकीत पुढची पिढी सक्रीय झाली आणि मातोश्रीबाबतच्या आदराची जागा व्यवहाराने घेतली. मातोश्री हा बंगला कुठे आहे? हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. तसेच या बंगल्यात पूर्वी कोण राहात होते आणि आता कोण राहते ते ही आपल्याला पुरते ठाऊक आहे. मात्र, या सगळ्यात आजवर कुणालाही जे ठाऊक नाही ते म्हणजे या मातोश्रीचा खर्च कसा चालतो ? इथे रेशन कोण भरते ? आणि या बंगल्याबाहेरच्या गाड्यांमध्ये इंधन कोण भरते ? दस्तूरखुद्द भास्कर जाधव यांनी या आशयाचे प्रश्न सर्वप्रथम विचारून महाराष्ट्राला चक्रवून सोडले होते.

चोवीस तास खडा पहारा असलेली ही वास्तू सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. त्यामुळे, या वास्तूच्या रहिवाशांबद्दल राज्यात कायम उत्सुकता आहे. या वास्तूमध्ये राहणारे जर का सामान्य नागरिक असते तर, हा लेखन प्रपंच झालाच नसता.

बाळासाहेब दिलदार होते. टीका मर्दासारखी अंगावर घ्यायचे. आताचे मातोश्रीवासी खुनशी आहेत. हा लेख लिहिणाऱ्यावर काहीही करून हल्ला चढवायचा ते प्रयत्न नक्की करतील. असो.

या बंगल्यातून केल्या जाणाऱ्या घोषणा आणि दिले गेलेले आदेश यामुळे मुंबई, महाराष्ट्र आणि प्रसंगी देशाचे नागरिक भरडलेले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या बंगल्यात राहणाऱ्यांनी स्वतःला परोक्ष आणि अपरोक्षपणे लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कक्षेत आणले आहे. तसेच, मुंबईच्या अस्मितेचे आणि मराठी माणसाच्या हितरक्षणाचे दावे करणारे सध्या इथेच राहतात. या सर्व बाबी सार्वजनिक असताना आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. मातोश्रीवाल्यांनी मराठी माणसाला खोटी स्वप्न दाखवून मुंबई लुटून खाल्ली असा दावा स्वतः राज श्रीकांत ठाकरे यांनीच केलाय. हा दावा खरा वाटू शकतो. कारण, जी आलिशान जीवन पद्धती मातोश्रीवाले जगतात त्यामागे नियमित उत्पन्नाचा निश्चित आणि सार्वजनिक स्रोत अगदी अलीकडे कुणाला ठाऊक नव्हता. शिवसेना प्रमुख हयात होते तोवर ही माहिती मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. किंबहुना लोकांना त्याची गरज नव्हती. कारण, बाळासाहेब यांचे वागणे तसे असायचे. मात्र, त्यांच्या वंशजांनी निवडणूक लढताना दिलेली प्रतिज्ञापत्र जी माहिती सार्वजनिक करतायत ती केवळ आश्चर्यकारक नव्हे तर, डोळे विस्फारणारी आहे. याचमुळे, मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या मुदत ठेवी आणि हजारो कोटींची दरवर्षीची मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पात होणारी उलाढाल यावर एकछत्री अंमल ठेवणारे सध्याचे मातोश्रीवाले वाममार्गाने संपत्ती तर मिळवत नाहीत ना ? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मातोश्रीच्या उत्पन्नाचा ज्ञात आणि अज्ञात स्रोत शोधण्याचा हा प्रयत्न. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचायला हवा. कारण, या लेखात तुम्हाला मातोश्रीवासियांच्या उत्पनाचे स्रोत सार्वजनिक करणारा बिभीषण कोण? हे ही तुम्हाला कळेल. आता मातोश्री निवासी असलेले दादू, वहिनी आणि आदू यांच्या बाबतचा सार्वजनिक तपशील काय सांगतो ते आधी लक्षात घ्या. आदूकडे स्वतःच्या मालकीची गाडी आहे. कोणती ? तर २०१० मध्ये नोंदवलेली आणि २०१९ मध्ये विकत घेतलेली MH-02-CB-1234 क्रमांकाची बीएमडब्ल्यू. वर्ष २०१९मध्ये खरेदी केलेल्या बीएमडब्ल्यूचे घोषित विमा मूल्य फक्त साडेसहा लाख रुपये असल्याचे सांगितले गेले आहे. साडेसहा लाखाची बीएमडब्ल्यू असते ? ते कसे हे कुणी शहाणा माणूस सांगू शकेल का? आदूच्या बाबतीत या पलीकडेही काही बाबी आहेत ज्यामुळे, भुवया उंचावतील. आदूच्याकडे २०२४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार ३७ हजार ३४४ रुपये रोख आहेत. तर, शेअर, डिबेंचर्स आदी गुंतवणुकीचे घोषित मूल्य २०१९ मध्ये २० लाख ३९ हजार १२ रुपये होते जे पाच वर्षात १० कोटी १४ लाख ९८ हजार ५२ रुपये झाले आहेत. दागदागिने म्हणून आदूकडे २०१९ मध्ये ६४ लाख ६५ हजार ७४ रुपये मूल्याच्या वस्तू होत्या. तर, २०२४ मध्ये हाच मुद्देमाल १ कोटी ९१ लाख ७ हजार १५९ रुपये मूल्याचा झाला. आदूकडे २०१९ला बँकेत १० कोटी ३६ लाख १५ हजार २१८ रुपये होते ते २०२४ मध्ये ते २ कोटी ८१ लाख २० हजार ७२३ झाले आहेत. एकुणात पाहिले तर, वर्ष २०२४ मध्ये आदूच्या नावे १५ कोटी ४३ लाख ३ हजार ६० रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. याशिवाय हिंदू अविभक्त कुटुंबाच्या खात्यावर १ कोटी ९६ लाख १५ हजार ६६८ रुपयांची मालमत्ता आहे. याव्यतिरिक्त आदूच्या नावे ६ कोटी ४ लाख ५१ हजार ३५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. आदू हा त्याच्या वडिलांवर अवलंबून नाही. त्यामुळे, इतकी संपत्ती बाळगणारा आदू काम काय करतो? हा प्रश्न कुणालाही पडेल. आदू नंतर दादूबाबत माहिती बघूया. दादूकडे स्वत:च्या मालकीची गाडी नाही. दादूकडून २०२० मध्ये प्रतिज्ञापत्र देऊन घोषित केलेली संपत्ती वाचून तुमचेही डोळे विस्फारातील. दादूकडे २०२० च्या प्रतिज्ञापत्रानुसार, ७६ हजार ९२२ रुपये रोख तसेच बँकेत १ कोटी ६० लाख ९३ हजार ६७५ रुपये होते. दादूच्या शेअर, डिबेंचर्स आदी गुंतवणुकीचे घोषित मूल्य २०२० मध्ये २१ कोटी ६८ लाख ५१ हजार १ रुपये इतके होते. तर, २०२० मध्ये दादूकडे २३ लाख २० हजार ७३६ रुपये मूल्याच्या दागिन्याची मालमत्ता आहे. एकुणात पाहिले तर, वर्ष २०२० मध्ये दादूच्या नावे २४ कोटी १४ लाख ९९ हजार ५९३ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहेयाशिवाय हिंदू अविभक्त कुटुंबाच्या खात्यावर १ कोटी ५८ लाख १४ हजार ३९५ रुपयांची मालमत्ता आहे. याव्यतिरिक्त दादूच्या नावे ५८ कोटी ८५ लाख ११ हजार ८७४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर, १४ कोटी ५० लाख ८५ हजार७२२ रुपयांची स्थावर मालमता दादूला वंशपरंपरेने मिळाली आहे. इतकी संपत्ती बाळगणारा दादू बालमोहन शाळेतून १९७६ला दहावी आणि १९८६ ला सर जे जे कला विद्यालयातून पदविका प्राप्त व्यक्ती असून एडीआर वेबसाईट सांगते की, दादूचा २०२०ला घोषित पेशा नोकरी होता. नोकरी करणारा मराठी माणूस इतकी संपत्ती कशी उभी करतो हे कोडं कसं सोडवायचं ? आदू आणि दादूच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका आहे वहिनींची. दादूसोबत प्रेमाविवाह झाल्याने डोंबिवलीतून मातोश्रीत आलेल्या वहिनींची जंगम मालमत्ता आहे ३६ कोटी १६ लाख ४३ हजार ४५५ रुपये. विशेष म्हणजे जंगम मालमत्तेत वहिनींकडे १ कोटी ३५ लाख २० हजार ९२९ रुपयांचे तर फक्त दागदागिने आहेत. वहिनींकडेही बरीच स्थावर मालमत्ता आहे. त्याची वर्ष २०२० मध्ये घोषित किंमत आहे ४८ कोटी ९३ लाख ९ हजार १९१ रुपये.

दादू आणि वहिनींच्या संपत्तीतली मजेशीर बाब तुम्हाला ठाऊक आहे? दादूने १० कोटी १६ लाख ५६ हजार ६०० रुपयांची प्रॉपर्टी स्वतः कमावली आहे. तर, वहिनींनी १२ कोटी ९९ लाख ५४ हजार २१० रुपयांची प्रॉपर्टी स्वतः कमावलेली आहे. तसेच, दादूने स्वतः घेतलेले ऍसेट्स आहेत ३७ कोटी ९३ लाख ७२ हजार २६२ रुपयांचे. तर, वहिनींनी २८ कोटी ९२ लाख ५९ हजार ३३६ रुपयांचे ऍसेट्स स्वतः घेतलेले आहेत. वहिनींच्या उत्पन्नाचा स्रोत काय ते जाहीर नाही. त्यांचे शिक्षण काय? जाहीर नाही. तरीही इतकी संपत्ती त्यांच्या नावे आहे आणि त्यातला काही हिस्सा त्यांनी स्व उत्पन्नातून कमावलाय हा तपशील दादूनेच स्वतः घोषित केलाय. मातोश्रीच्या या तिघांच्याही नियमित उत्पन्नाचा निश्चित आणि सार्वजनिक स्रोत जरी माहीत झाला तरी इतकी करोडोंची संपत्ती काही दशकात कशी कमवता येते हे मराठी माणसांना कळू शकेल. पण, तसे होणार नाही. या मातोश्रीवासियांचा सर्वपरिचित एकच धंदा आहे. तो म्हणजे प्रबोधन प्रकाशन. त्या प्रकाशनाकडून काही हजार खपाची मार्मिक आणि सामना ही नियतकालिके छापली जातात. पण, या अंतर्गत झालेली गंमत तर खरी पुढेच आहे. सर्वात आधी प्रबोधन प्रकाशन नावाने विश्वस्त संस्था (पब्लिक ट्रस्ट) ची स्थापना केली गेली. लोकांकडून निधी वसूल केला गेला आणि संस्थेचा तोटा भरून काढला असे दाखवले गेले. आयकर विभागाने गोळा केलेल्या निधीचा दोन तृतीयांश हिस्सा अशा प्रकारे खर्च करायला विरोध केला. त्यानंतर, प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीला प्रबोधन प्रकाशनाने स्वतःची व्यवहार सांभाळणारी संस्था (ऑपरेटिंग एजन्सी) नेमले. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत दादू, आदू, तेजू आणि वाहिनी हेच एका कुटुंबातील सदस्य ३१ मार्च २०१८ पर्यंत आळीपाळीने शेअर होल्डर्स राहिलेले आहेत. या कंपनीने, कोविड काळात ४२ कोटींची उलाढाल तर केलीच शिवाय ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा कमावला. या कंपनीने सरकारला स्वतः जी माहिती दिली आहे त्यानुसार, आर्थिक वर्ष 2014-15 ते आर्थिक वर्ष 2017-18 पर्यंत कंपनी तोट्यात होती. मात्र, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 37 कोटी 18 लाखाची उलाढाल झाली आणि कंपनीला 3 कोटी 39 लाखाचा नफा झाला. तसेच, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपनीने 44 कोटी 52 लाखाची उलाढाल केली आणि 9 कोटी 46 लाखाचा नफा कमावला. इतकंच नव्हे तर, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 43 कोटी 97 लाखाची उलाढाल करत कंपनीने कमावलेला नफा आहे 11 कोटी 50 लाख रुपये. कोरोना काळात जेव्हा सगळी वृत्तपत्र तोट्यात गेली होती तेव्हा प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोट्यवधींचा नफा कमावत होती. त्यामुळे, प्रबोधन ही मातोश्रीवासीयांसाठी काळ्याचे पांढरे करण्याची सोय तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातोय. मातोश्रीच्या दारात दिमतीला असलेल्या अनेक महागड्या गाड्या या कंपनीच्या नावावर आहेत. हे ही लक्षात घेण्याजोगे आहे.

याच्या जोडीला मातोश्रीला रसद पुरवण्याचा मुख्य स्रोत आजही बीएमसी आहे असे निरीक्षण लपून राहात नाही. यशवंत जाधव या व्यक्तीवर आयकराची धाड पडली. त्यातून समोर आलेला तपशील याचकडे लक्ष वेधतोय. त्यातही मुंबई मनपाची स्थायी समिती आणि सुधार समिती प्रामुख्याने रसद पुरावायची असे निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे. स्टँडिंग कमिटीत मंजूर होणारे ठराव आणि इम्प्रुव्हमेंट कमिटीत सरकारी जमिनीची आरक्षणे बदलण्याची प्रकरणे तपासली तर, याचा खुलासा होईल. जोडीला बीएमसीत सल्लागार नेमण्याचा घोळ घालून बंगल्यावर पैसे पोहचतात असे संदीप देशपांडे याने म्हटले आहे. बीएमसीच्या प्रकल्पासाठी अव्वाच्या सव्वा मेहनताना देऊन सल्लागार नेमले जातात. त्याबदल्यात, हेच सल्लागार ठरलेला वाटा मातोश्रीवर पोहचवतात असं देशपांडे बोलून गेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीएमसीतला भ्रष्टाचार यावर संतापून दादूला उद्देशून एका सभेत म्हटलं होतं की, ‘आधी स्वतःच्या बायकोला बीएमसीत जायचे बंद कर.’राज यांना पुरते ठाऊक आहे की, मातोश्रीच्या अर्थकारणाच्या खऱ्या सूत्रधार वहिनी आहेत. त्यांनी माहेरच्या लोकांच्या मदतीने विणलेले जाळे इतके बेमालूम आहे की, त्यात ना सहज प्रवेश असतो ना सुटका. त्यांच्यासमोर दादू, आदू ही फक्त प्यादी आहेत.आजगावकर नामक एका सनदी लेखपालाला हाताशी धरून पैसा जिरवण्याचे काम बीकेसीमधील वैभव चेंबर्स मधून चालतेअसे राणे सांगतात. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र गेल्यावर पक्षाच्या नावे असलेली ५० कोटीची मुदत ठेव आपल्यालाच मिळावी म्हणून मातोश्रीचा जीव नुसता कासावीस झालेला आपण पाहिला आहे. मविआच्या सत्ताकाळात पोलीस बदल्या का रखडल्या होत्या? याचं खरं उत्तर तत्कालीन गृहमंत्र्यांनी दिलं तर, महाराष्ट्रात आणखी एक भूकंप होईल. हा इतका सगळा पसारा केवळ हिमनगाचे एक टोक असून त्या आर्थिक व्यवहाराची केवळ समाजात चर्चाच होतेय असे नाही. तर, आर्थिक गुन्हे शाखेकडे याच्या तक्रारी गेल्या आहेत आणि मातोश्रीच्या अर्थकारणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी श्रीमती गौरी भिडे आणि श्री. अभय भिडे यांनी एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. त्या याचिकेतून मिळालेली माहिती सुद्धा इथे मांडली गेली आहे. विशेष म्हणजे काही हजारात खप असलेली ‘मार्मिक’ आणि ‘सामना’ ही प्रकाशने हा काही मातोश्रीवासीयांच्या पोटाची खळगी भरणारा मूळ धंदा नाही याचे संकेत अभय भिडेंना देणारी व्यक्ती होती श्रीकांत केशव ठाकरे. याच श्रीकांत ठाकरेंच्या आग्रहाखातर भिडेंच्या राजमुद्रा प्रिंटिंग प्रेसने एकेकाळी सामानाची ‘फुलोरा’ पुरवणी छापून दिलीय. आणीबाणीच्या काळात भिडे यांची राजमुद्रा प्रिंटिंग प्रेस ठाकरेंच्या प्रकाशनांना इंदिरा गांधींची नजर चुकवून छापत असे. श्रीकांत ठाकरे यांनी तसे स्वतःच्या आत्मचरित्रात तसे लिहिलेले आहे. त्यामुळे अभय आणि गौरी भिडे यांनी याचिकेत दिलेली माहिती जबाबदार मानली जाऊ शकतेच.

वर्षानुवर्षे मुंबई महानगर पालिका ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी स्वतःच्या कब्जात ठेवलेल्यांचा व्यवहार अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बेमालूमपणे सांभाळला जातोय. त्याची आर्थिक चौकशीही झालीय आणि त्यातून असे समोर आलेले आहे की, वहिनींच्या भावाच्या माध्यमातून अनेकानेक बांधकाम आणि इतरही व्यवसायात छुपी गुंतवणूक करत काळ्याचे पांढरे होऊन मातोश्रीची तिजोरी भरली जातेय. मराठी माणसाला भूलथापा देऊन कमावलेली संपत्ती गुंतवायला अमराठी माणसे का लागतात? असा सवाल राणे विचारतात. तेव्हा मातोश्रीवासीय उत्तर देऊ शकत नाहीत. नंदकुमार चतुर्वेदी नामक विकासक आणि वहिनींचे बंधुराज यांच्या आर्थिक व्यवहाराचा याला संदर्भ आहे. अशा काही कंपन्यात आदू भागीदार असल्याची माहिती दादूने प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवलीय. त्यामुळे, झालेला गहजब आपल्याला आठवला असेलच. विशेष असे की, मराठी माणसाला अस्मितेच्या घोळात गुंतवून मातोश्रीच्या समोर कलानगरातील आणखी एक बंगला विकत घेऊन त्यावर टोलेजंग इमला उभा राहीलाय. दुसरीकडे, मराठी माणूस मात्र, मुंबईतून हद्दपार झालाय.

एव्हाना तुम्हाला लक्षात आले असेलच की, मातोश्रीला मुंबई मनपा हवीय कशाला?

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Scroll to Top