– दिनेश गुणे
सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट सर्वांना माहीत आहे. या गोष्टीतील कोंबडीचा मालक एकाच वेळी कोंबडीच्या पोटातील सगळी सोन्याची अंडी मिळविण्याच्या हावरटपणापायी कोंबडी कापतो आणि फसतो. हे माहीत झाल्यापासून आता सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कुणाला सापडली, तर कोंबडी कापून सारी अंडी एकाच वेळी मिळविण्याचा मूर्खपणा तो करत नाही. उलट, कोंबडीला भरपूर चमचमीत खायला घालतो, तिची काळजी घेतो, तिने सातत्याने भरपूर सोन्याची अंडी द्यावीत आणि आपण मालामाल होत राहावे, एवढा शहाणपणा त्याला आता आला आहे. म्हणूनच, सोन्याची अंडी देणारी ती कोंबडी आपल्याला मिळावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. ती ज्याला मिळते, त्याचे भाग्य फळफळते. तो मालामाल होतो. देशातील एखाद्या राज्याच्या आकारमानाएवढा अवाढव्य अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका ही अनेकांच्या नजरेत सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरलेली आहे. ही कोंबडी आपल्याला मिळावी म्हणून राजकारणाच्या मैदानावर अक्षरशः रणकंदन चालते, तर ती हातची निसटू नये यासाठी सारी शक्ती पणाला लावली जाते. मुंबई महापालिकेचा सन २०२५-२५ या वर्षाचा सुमारे ७५ हजार कोटींचा अर्थसंकल्प म्हणजेच सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी वर्षागणिक अधिक धष्टपुष्ट होत असल्याचा स्पष्ट पुरावा असल्याने, महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ही कोंबडी मिळविण्यासाठी रणधुमाळी होणार हे स्पष्ट आहे. या अर्थसंकल्पात रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा आदींवरील खर्चासाठी सर्वाधिक तरतूद असल्याने, या प्रत्येक कामादरम्यान सोन्याच्या अंड्यांचा सुकाळ होणार हे आता गुपित राहिलेले नाही. ‘मुंबईकरांच्या उज्ज्वल उद्यासाठी आज थोडी गैरसोय सहन करा’ असा संदेश देणारे फलक जागोजागी पाहात मुंबईकरांच्या अनेक पिढ्या वाढल्या, म्हाताऱ्या झाल्या आणि उज्ज्वल उद्याची स्वप्ने पाहात थकूनही गेल्या. अनेकांनी वर्षानुवर्षे उराशी जपलेले मुंबईच्या त्या ‘उज्ज्वल उद्या’चे स्वप्न दीर्घ प्रतीक्षेनंतरही साकारलेच नाही. तो ‘उद्या’ पाहणे नशीबीच नाही अशा उदासभावाने अनेकांनी मुंबई सोडली, मुंबईबाहेरच्या उपनगरांपलीकडच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या आणि गैरसोयींचा बुजबुजाट असलेल्या शहरांचा आश्रय घेतला. काहींनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला, आणि तेथूनही, मुंबईतील उज्ज्वल उद्याचा तो स्वप्नातील दिवस केव्हा उजाडतो याकडे मोठ्या आशेने नजरा लावल्या. वर्षानुवर्षे जपलेल्या या स्वप्नाचे काही तुकडे आता मेट्रोसारख्या महानगरी सुविधांनी सजले असले, तरी उज्ज्वल उद्याचे संपूर्ण स्वप्न मात्र कधीच साकार झालेले नाही. हे फलक मिरविणारे पत्र्याचे अडथळे वर्षानुवर्षे गैरसोयीचे डोंगर करून रस्त्यांच्या छाताडावर मुंबईकरांस वाकुल्या दाखवत उभे असतात, आणि त्याच रस्त्यांची पावसाळ्याच्या मागेपुढे खड्ड्यांनी होणारी चाळण पाहात मुंबईकर स्वःतःच्या नशिबाला दोष देत सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीच्या मालकाची मनोमन आठवण काढत राहतात. ही कोंबडी कुठे आहे, तिचा मालक कोण, त्याने आतापर्यंत सोन्याची किती अंडी कमावली असतील, याचे हिशेब मुंबईकरांस एव्हाना तोंडपाठ झाले आहेत. अधूनमधून कधी पश्चिम उपनगरातून वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जायची वेळ आलीच. तर नकळत त्याची नजर उपनगराच्या दक्षिण हद्दीवरील एखाद्या जागेवर खिळते, आणि सोन्याचे अंडे देणारी कोंबडी इथेच कुठेतरी असली पाहिजे असा विचार करत तो स्वतःच्या कमनशिबाचे पाढे आठवू लागतो!
सिरॅक्यूजच्या राजाकरिता एका सुवर्णकाराने बनविलेल्या मुकुटातील सोन्याच्या शुद्धतेबद्दल शंका आल्याने ती तपासण्यासाठी राजाने आर्किमिडीज नावाच्या गणितज्ज्ञाला पाचारण केले. तो शुद्ध सोन्याचा आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी आर्किमिडीजला त्या मुकुटाची घनता मोजायला होती, पण मुकुट न वितळविता ती कशी मोजावी याचा विचार करत असताना एकदा टबात आंघोळ करत असताना त्याच्या शरीराच्या आकारमानाएवढे पाणी टबमधून बाहेर फेकले गेले, आणि आर्किमिडीजला उत्तर सापडले. प्रत्येक वस्तू तिच्या आकारमानाएवढे पाणी विस्थापित करते हा शोध त्याला लागला, आणि मुकुट व तेवढ्याच वजनाचे शुद्ध सोने पाण्यात बुडवले. शुद्ध सोन्याच्या तुकड्याहून अधिक पाणी मुकुटामुळे बाहेर फेकले गेल्याचे लक्षात आल्यावर मुकुटातील भेसळ शोधणे सोपे झाले, आणि पुढे हा सिद्धान्त अन्य अनेक बाबींसाठी प्रमाण मानला जाऊ लागला. मुंबईच्या रस्त्यांवरल्या खड्ड्यांची गोष्टदेखील अशीच आहे. एका ठिकाणी पडणारा खड्डा हा तेवढ्याच आकारमानाचे कोणाचे तरी खिसे भरतो, ही मुंबईकराची समजूत आता पक्की झाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे अर्थकारणही एव्हाना सामान्य मुंबईकरांस ठाऊक झालेले आहे. जितके खड्डे अधिक, तितके खिसे भरण्याचे प्रमाण मोठे हे गणितही त्याला माहीत आहे. त्यामुळे पावसाळ्याचे निमित्त साधून रस्तोरस्ती पडणारे जीवघेणे खड्डे आणि ते बुजविण्यासाठी खर्च होणारी कोट्यवधींची रक्कम यांच्यामागील ‘व्यवहारा’चे गूढ त्याला उकललेले आहे. गेल्या जवळपास दहा वर्षांत केवळ खड्डे बुजविण्याच्या कामावर मुंबई महापालिकेने अक्षरशः शेकडो कोटींची रक्कम खर्च केली आहे. तरी खड्डे बुजविण्याचे कामाची महापालिकेची आस काही कमी झालेली नाही. एखाद्या वार्षिक व्रतासारखे हे काम कायमच आवडीने का बजावले जाते, हे गुपित राहिलेले नाही. खड्ड्यांच्या भरावापायी खर्च होणारी रक्कम आणि खड्ड्यांमध्ये प्रत्यक्ष पडणारा भराव यांच्या आकारमानातील व्यस्तता आता आर्किमिडीजला लागलेल्या शोधाप्रमाणे मुंबईकरांसही ठाऊक झालेली आहे. एका ठिकाणी पडणारा खड्डा हा दुसऱ्या कोणाच्या तरी खिशात पडणारा भराव असतो, ही बाब मुंबईकराच्या मनात पक्की ठसलेली असल्याने, आता खड्डेमुक्त मुंबईचे उज्ज्वल उद्याचे स्वप्न त्यास पडेनासे झाले आहे.

आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, पूरनियंत्रण, मलनिस्सारण, अशा अत्यंत महत्वाच्या नागरी सेवासुविधा पुरविण्याची मोठी जबाबदारी पेलणाऱ्या मुंबई महापालिकेची ही खाती नेहमीच भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुरफटलेली राहिली आहेत. प्रामुख्याने भांडवली खर्चाच्या प्रत्येक कामाचे भ्रष्टाचाराशी थेट आणि जवळचे नाते असल्याचा आरोप केला जातो. सुमारे ७५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेत गेल्या काही वर्षांत तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केलेला आरोप वरवर अविश्वसनीय वाटू शकतो. ज्या महापालिकेचा अर्थसंकल्पच ७५ हजार कोटींचा, तेथे तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार कसा, असा प्रश्न जरी सामान्य मुंबईकरांस पडला, तरी त्याच्या चेहऱ्यावर तो उमटत नाहीच, उलट त्याचा या आकड्यावरही विश्वास बसतो. कारण, भ्रष्टाचारमुक्त कारभार या संकल्पनेवरचा त्याचा विश्वास मुंबईच्या मिठी नदीच्या प्रदूषित पाण्यात केव्हाच बुडाला आहे.
मिठी नदीचा उल्लेख आला, की मुंबईकरास या नदीतील गाळ काढण्याच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण हमखास होते. प्रत्येक पावसाळ्यात जलमय होणाऱ्या मुंबईतील पाण्याचा निचरा करण्यासाठी मिठी नदीतील गाळ उपसून तिचे पात्र विस्तृत करण्यासाठी दर वर्षी कोट्यवधींचा खर्च कागदोपत्री केल्याचे दाखविले जाते. प्रत्यक्षात मात्र, बनावट कागदपत्रे आणि फुगविलेली बिले व खोटे सामंजस्य करार करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने होत राहिला. या प्रकरणी विशेष चौकशी पथकाने काही धागेदोरेही शोधून काढले, काही कंत्राटदार, दलाल, महापालिका अधिकाऱ्यांचा सहभागही उघडकीस आला, आरोपपत्रेही दाखल झाली, पण दोषसिद्धीच्या टप्प्यावर हे प्रकरण थांबले. असे कोणतेही काम भ्रष्टाचारापासून मुक्त असणारच नाही, याविषयी मुंबईकराच्या मनात कोणतीच शंका मात्र राहिलेली नाही.
भ्रष्टाचार हा नेहमीच संधीच्या शोधात असतो, असे म्हणतात. ही संधी कोणत्याही रूपाने समोर चालून आली की तिच्यावर झडप घालण्याची चपळाई ज्याला दाखविता येते, तो त्या संधीचे सोने करतो. म्हणूनच, संकटातही भ्रष्टाचाराच्या संधी शोधण्याच्या मानसिकतेचा मोठा गवगवा कोविड महामारीच्या काळात झाला, आणि संधीचे सोने करणारे अनेक मानभावी मुखवटे मुंबईसमोर उघड झाले. मृताच्या टाळूवरचे लोणी लाटणे ही केवळ म्हण नाही. ती एक मानसिकता असते. कोविड महामारीच्या काळात भ्रष्टाचाराच्या ज्या आरोपांची राळ उठविली गेली, त्यावरून मुंबईकरास त्याची खात्री पटली. संकटाच्या स्थितीचा नेमका फायदा उठवून आरोग्य सेवेच्या नावाखाली अनेक कामांच्या कंत्राटांची खैरात करताना नियम आणि कार्यपद्धती खुंटीवर टांगली गेल्याचा आरोप झाला. निविदा वगैरे न मागविताच थेट पद्धतीने अनेक कंत्राटे मर्जीतल्यांना आणि सगेसोयऱ्यांना बहाल करण्यात आली, आणि भ्रष्टाचाराचे किळसवाणे वाभाडे सुरू झाले. जंबो कोविड सेंटर्स, फिल्ड हॉस्पिटल्स, ऑक्सिजन प्लांट, मृतदेह गुंडाळण्यासाठीच्या पिशव्या, रेमडेसिवीर आदींच्याा खरेदीचे दर प्रमाणाबाहेर फुगविणे, पात्रता व अनुभवही नसलेल्यांना पुरवठ्याची कंत्राटे बहाल करणे, असे आरोप झाले, काही प्रकरणात ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीदेखील केली, मालमत्ता जप्तीसारख्या कारवायादेखील झाल्या. महालेखाकारांच्या अहवालातूनही आर्थिक अनियमिततेवर नेमके बोट ठेवण्यात आले, आणि सुमारे साडेबारा हजार कोटींच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करण्याकरिता विशेष पथक नियुक्त करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला. भ्रष्टाचाराच्या आरोपांची शहानिशा करण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे आणि महापालिकेची भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून आता मुंबईच्या महापालिकेची भ्रष्टाचारमुक्तीचा आनंद मिळणार या अपेक्षेने मुंबईकराच्या नजरा चौकशीवर खिळल्या. अजूनही त्यांस अपेक्षापूर्तीचे समाधान मात्र प्राप्त झालेले नाही. कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप होतात, एकमेकांकडे बोटे दाखविली जातात, पुराव्यांचे कागदी घोडे दाखविले जातात, आणि थेट नावानिशी सारे तपशीलही उघड केले जातात. ‘आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला लपायला जागा राहणार नाही’ असे सज्जड इशारेही दिले जातात, पण कुणी तोंड उघडले आणि खरोखरच कोणास लपण्यासाठी जागा शोधायची वेळ आली अशा अनुभवापासून मात्र मुंबईकर अजूनही वंचितच राहिला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक गैरव्यवहारांचा प्रश्न नाही, तर तो नागरिकांच्या जीवनमानाशी थेट जोडलेला प्रश्न आहे. निकृष्ट रस्ते, पूरस्थिती, आरोग्य सुविधांतील त्रुटी यामागे भ्रष्टाचाराची सावली स्पष्टपणे दिसते. चौकशी संस्था सक्रिय असल्या तरी, वेळीच निष्कर्ष, पारदर्शकता आणि ठोस कारवाई यांचा अभाव असल्याने नागरिकांचा विश्वास डळमळीत होत आहे. जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या आरोपांवर दोषसिद्धी, शिक्षा आणि प्रणालीगत सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार हा विषय चर्चेतच राहणार.
