
जागतिक स्तरावर महिलांचे हक्क, सक्षमीकरण आणि समानता यांसंदर्भात महत्त्वपूर्ण मानले जाणारे संयुक्त राष्ट्र महिला स्थिती आयोगाचे ७० वे अधिवेशन ९ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत संयुक्त राष्ट्र मुख्यालय, न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात येत आहे. या अधिवेशनात जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्था तसेच आर्थिक व सामाजिक परिषदेकडून मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतातील भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या प्रतिनिधींचा सहभाग ही अभिमानाची बाब मानली जात आहे. भारतीय समाजजीवनात स्त्रीशक्तीची भूमिका, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या माध्यमातून जागतिक स्तरावर मांडली जाणार आहे.
या अधिवेशनात भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने नयना सहस्रबुद्धे, डॉ. ज्योती चौथाईवाले, निपा शुक्ला, उज्वला करंबेळकर, विशाखा माशंकर, रश्मी सामंत आणि साजी नारायण या प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. या सर्व प्रतिनिधी विविध चर्चासत्रे, संवाद आणि विचारमंथनाच्या माध्यमातून भारतीय स्त्रीशक्तीचे विचार आणि अनुभव आंतरराष्ट्रीय मंचावर मांडणार आहेत.
या अधिवेशनाचा प्रमुख विषय “सर्व महिला व मुलींना न्यायप्रवेश सुनिश्चित करणे आणि बळकट करणे” हा आहे. या अंतर्गत सर्वसमावेशक आणि न्याय्य कायदेव्यवस्था निर्माण करणे, भेदभावपूर्ण कायदे, धोरणे आणि पद्धती दूर करणे तसेच महिलांना न्याय मिळविताना येणाऱ्या संरचनात्मक अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय महिलांना न्यायव्यवस्थेत समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे अधिकार प्रभावीपणे संरक्षित करणे आणि सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय पातळीवर त्यांचे सशक्तीकरण करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
तसेच या अधिवेशनात पुनरावलोकन विषय म्हणून सार्वजनिक जीवनात महिलांचा पूर्ण आणि प्रभावी सहभाग, निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक सक्षम करणे तसेच महिलांवरील हिंसाचाराचे निर्मूलन करून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विविध देशांच्या अनुभवांचा आढावा घेतला जाणार आहे. महिलांच्या नेतृत्वविकासाला चालना देणे, धोरणनिर्मिती प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही या अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे.
भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रतिनिधींना या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत असून, जागतिक स्तरावर भारताच्या स्त्रीशक्तीचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.