
सुभाषनगर परिसरात आयोजित करण्यात आलेले ‘सकल हिंदू संमेलन’ गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सायं. ६ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. “विचार एक – घोषणा एक – हिंदू सारा एक” या ब्रीदवाक्याखाली झालेल्या या संमेलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या संमेलनाचे अध्यक्ष श्री. मोहनराव गुजराथी होते. सूत्र संचालन श्री. दिलीप टिकले यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. विविध मान्यवरांची ओळख करून देताना त्यांनी संपूर्ण कार्यक्रम रंगतदार केला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुनील देवधर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून संघाचा शंभर वर्षाचा इतिहास सांगताना, संघाचे संस्थापक प. पू. डॉ . हेडगेवार ह्यांचे चरित्र आणि संघ स्थापने मागील विचार, थोडक्यात सांगितला. स्वयंसेवकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघ कार्य देशाच्या काना कोपऱ्यात पोचवले. कित्येक स्वयंसेवकांनी जीवनाची आहुती दिली त्यामुळे आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना झाला आहे. हिंदू समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
संमेलनात संतांचे आशीर्वचन देण्यासाठी श्री. भरतकुमार महाराज यांची उपस्थिती लाभली. त्यांनी अध्यात्मिक विचार मांडत समाजात एकात्मता आणि सद्भावनेचा संदेश दिला.
यावेळी मराठीतील ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस (शि. द. फडणीस) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीतून गेली पाच दशके वाचकांना खळखळून हसवणाऱ्या फडणीस यांनी व्यंगचित्रांविषयीचा पारंपरिक समज बदलून टाकला. व्यंगचित्रे म्हणजे केवळ बोचरी टीका किंवा वेडीवाकडी रेखाटने नसून, त्यातूनही सौंदर्य, विनोद आणि सूक्ष्म संदेश व्यक्त होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या कलेतून दाखवून दिले. विशेष म्हणजे वयाच्या शंभरीतही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांनीही आपले विचार मांडले. श्री.सौरभ कर्डे यांनी शिवव्याख्यानातून इतिहासाची उजळणी केली, तर प्रा. सुधीर गाडे यांनी सामाजिक समरसतेवर मार्गदर्शन केले. तसेच सौ. डिंपल शाह यांनी कुटुंब प्रबोधनावर विचार मांडले.
यावेळी कलावर्धिनी डान्स कंपनीच्या सौ. अरुंधती पटवर्धन व त्यांच्या शिष्या ह्यांनी सादर केलेला संघ गीतांवर आधारित भरतनाट्यम नृत्याविष्कार विशेष आकर्षण ठरला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाषनगर परिसर सकल हिंदू संमेलन समिती तसेच परिसरातील सर्व प्रमुख सामाजिक व धार्मिक मंडळांचा सहभाग होता. सर्व मंडळांनी एकत्र येऊन केलेला हा पहिलाच कार्यक्रम होता.
कार्यक्रमाने एकात्मतेचा आणि सांस्कृतिक जाणीवेचा प्रभावी संदेश दिला
