
धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश
मुंबई : राज्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्यासाठी पोलिसांना ठोस निर्देश दिले आहेत. महिलांची सुरक्षा आणि गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपास अधिक प्रभावी व निष्पक्ष करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
गेल्या काही दिवसांत नाशिकमधील धर्मांतर प्रकरण, परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरण, खरात प्रकरण तसेच मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.” नाशिकमधील प्रकरण स्वतःहून उघडकीस आणल्याबद्दल त्यांनी स्थानिक पोलिसांचे कौतुक केले, मात्र पुढील तपास अधिक सखोल आणि दमदार करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणातील प्रत्येक बाब, त्यामागील पद्धती आणि संभाव्य जाळ्याचा तपास करण्यात यावा, कोणताही मुद्दा दुर्लक्षित राहू नये, असे त्यांनी अधोरेखित केले.
तसेच परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाबाबत बोलताना, पीडितांना पुढे येऊन तक्रार देण्यासाठी विश्वास निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी समुपदेशनाची मदत घेण्याचे तसेच समाजसेवकांचा सहभाग वाढवून पीडितांना आधार देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
एकूणच, राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहून कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.