
संस्कृत साहित्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले आहे. हितोपदेश संधी प्रकरण या चौथ्या ग्रंथासह हितोपदेशाची चारही ग्रंथमालिका पूर्ण झाली असून, त्याचबरोबर रघुवंशम् महाकाव्यातील दहाव्या सर्गाचाही स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. या दोन प्रकाशनांमुळे प्रा. पुंड यांच्या ग्रंथसंख्येने अनुक्रमे ९३ आणि ९४ या टप्प्यांवर मजल मारली आहे.
प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीतील कथात्मक नीतीशिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण मानल्या जाणाऱ्या हितोपदेश या ग्रंथाचा उगम नारायण पंडित यांच्या लेखणीतून झाला. प्राण्यांच्या कथांद्वारे जीवनमूल्ये शिकवणाऱ्या या ग्रंथाचे मूळ स्वरूप चार प्रकरणांमध्ये—मित्रलाभ, सुहृद्भेद, विग्रह आणि संधी—असे विभागलेले आहे. यापैकी ‘संधी प्रकरण’ या चौथ्या भागाच्या प्रकाशनाने ही मालिका पूर्णत्वास गेली आहे. या ग्रंथमालिकेत कथा केवळ सांगण्याऐवजी “कथा अशी का आहे?” याचा सखोल ऊहापोह करण्यात आला असून, आजच्या जीवनाशी त्याची सांगड घालण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे ही मालिका संस्कृत आणि संस्कृतीप्रेमींसाठी उपयुक्त ठरत आहे. या ग्रंथाचे प्रकाशन प्रसाद प्रकाशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, संस्कृत साहित्यातील महत्त्वाचे महाकाव्य रघुवंशम् यातील दहावा सर्गही स्वतंत्र ग्रंथरूपाने प्रकाशित झाला आहे. या महाकाव्याचे लेखक कालिदास असून, सुमारे १५०० श्लोकांच्या या विस्तृत काव्यातील दहावा सर्ग रामावताराच्या कथेला समर्पित आहे. भगवान विष्णूंचे देवतांना दर्शन, रावणवधासाठी अवताराची घोषणा, तसेच अयोध्येतील रामजन्माचा आनंदोत्सव अशा प्रभावी घटनांनी हा सर्ग समृद्ध आहे. प्रत्येक श्लोकाचे सविस्तर विवेचन या ग्रंथातून करण्यात आले असून, रसिकांना मूळ काव्याचा आस्वाद अधिक सखोलपणे घेता येणार आहे. या ग्रंथाचे प्रकाशन अविरत प्रकाशन, जळगाव यांनी केले आहे.
दोन्ही ग्रंथांच्या प्रकाशनामुळे संस्कृत साहित्याच्या अभ्यासकांना आणि नव्या पिढीला मूल्याधारित साहित्याचा ठेवा उपलब्ध झाला असून, या ग्रंथमालिका प्रत्येक घरात असाव्यात, असे आवाहन प्रकाशकांकडून करण्यात आले आहे.
