तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताय ? मग यांचंही दर्शन घेताय नं ? तरच होईल नवस पूर्ण …….
जागर देवीचा
उभ्या महाराष्ट्राची आई…. तुळजापूरची माता भवानी….. लेकरांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्यावर मायेचं छत्र धरणारी आई तुळजाभवानी. तिच्या दर्शनासाठी दूरवरून येणारे भक्त यथाशक्ती दान देतात आणि देवीसमोर मागणंही मागतात. पण तुळजापूरच्या मंदिराची, तिथे असणाऱ्या छोट्या इतर मंदिरांची फार कमी लोकांना माहिती आहे असं दिसतं. तुळजापूरचं मंदिर हे भक्तांच्या विविध अडचणींवर इलाज शोधणारं polyclinic आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग जाणून घेऊया मंदिरात असणाऱ्या प्रथा, परंपरा, श्रद्धास्थानं आणि त्यांचं महात्म्य.
भवानी शंकर
भारतीय संस्कृतीमध्ये देवी पार्वती आणि शंकराला अवघ्या सृष्टीचे माता पिता मानलं जातं. म्हणून पार्वती रूपातील माता भवानी आणि पिता रूपातील भवानी शंकर यांच्यापासून सुरुवात करूया.
तुळजापूरचं मंदिर हे असं एकमेव मंदिर आहे जिथे देवीसमोर स्वयंभू शिवलिंग आहे. ह्या भवानीच्या शंकराचं वैशिष्ट्य असं की दररोज मंदिराचे दरवाजे उघडताना आधी मान भवानी शंकराचा पण दरवाजे बंद होताना मात्र देवीचे दरवाजे बंद होतात आणि मग भवानी शंकराचे. रोजच्या अभिषेकासाठीही आधी मान भवानी शंकराचा. शंकराचं दर्शन झाल्यावर त्याची नजर उतरवली जाते. पूर्वी लग्न लावताना मुलाची पाठ शंकराकडे आणि मुलीची पाठ देवीकडे अशा पद्धतीने गाभाऱ्यातच लावलं जायचं. लग्नकार्यानंतर केवळ देवीचंच दर्शन नाही तर देवीच्या दर्शनानंतर भवानी शंकराचं दर्शन घेतल्यानंतरच परिक्रमा पूर्ण होते असं मानलं जातं. देवीचे सगळेच विधी हे शंकराला धरून आहेत. देवीच्या दर्शनानंतर मंदिराबाहेर जे कडे (साखळदंड) आहेत ते अंगाभोवती फिरवल्यानंतर भक्तांची सगळी विघ्नं दूर होतात अशी श्रद्धा आहे.
अष्टौप्रहर जागृत असणाऱ्या देवीच्या दर्शनाबरोबरच भवानी शंकराचे आशीर्वाद तुम्हीही नक्की घ्या आणि आपल्या आप्तस्वकीयांना पण सांगा…..
खुप छान पेज तयार केले आहेत माहिती पण खूप छान दिली आहे